
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ८ जुलै)
गडचिरोली शहरालगत असलेल्या चांदाळा जंगल परिसरात तस्कर हत्तीने ३५ वर्षीय इसमाला चिरळून ठार केल्याची घटना आज (दि. ८ जुलै ) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली आहे.मृतक इसमाचे नाव धनराज पुंजीराम मडावी वय ३५ वर्ष (रा. मेंढा, बोधली) आहे.
सदर इसम हा मेंढ्यावरून चांदाळ्याला पायी चालत जात होता. खताची (शेतात टाकण्यासाठी रासायनिक खत ) चौकशी करण्याकरिता चांदाळा जात असल्याची माहिती मेंढा वासियांनी दिली आहे. सदर मृत्तक व्यक्ती ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होती.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आला आहे.
वन विभागाचे आवाहन
!!
वन विभागाने पुन्हा एकदा नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे, वन्यप्राण्यांना कोणत्याही परिस्थितीत चिथावणी न देण्याचे आणि सेल्फी काढण्याचा मोह टाळण्याचे आवाहन केले आहे.वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.
