गडचिरोली : नगरसेवक हर्षल गेडाम यांचे सदस्यत्व रद्द करा
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१५ जुलै)
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन नगरपरिषद गडचिरोली प्रभाग क्र. २-अ चे सदस्य हर्षल दादाजी गेडाम यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याची तसेच संबंधित प्रकरणात आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषद गडचिरोलीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्र. २-अ मधून हर्षल दादाजी गेडाम हे सदस्य म्हणून निवडून आले होते. नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांनी परधान अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पोचपावती सादर केली होती.
मात्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली यांच्या निर्णयानुसार त्यांचा गोंड अनुसूचित जमातीचा दावा यापूर्वीच वैध ठरलेला असल्याने त्यानंतर नव्याने सादर करण्यात आलेले परधान अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हा सहयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी दिनांक ०९ जून २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद गडचिरोली यांना लेखी आदेश देऊन हर्षल दादाजी गेडाम यांचे सदस्यत्व भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधित आदेशानंतरही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखी आदेशाची अंमलबजावणी न होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे शासनाच्या आदेशाचा तसेच कायदेशीर प्रक्रियेचा अवमान झाला आहे. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.
यासोबतच हर्षल दादाजी गेडाम यांचे नगरपरिषद सदस्यत्व तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी निवेदन देताना गटनेता तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक नंदु कायरकर, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, उपस्थित होते.
