गडचिरोली : ३ नोव्हेंबरला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २७ ऑक्टोबर २०२६)
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच विविध ज्वलंत मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
सकाळी ११.०० वाजता या मोर्चाची सुरुवात चामोर्शी रोड वरील पक्ष कार्यालयातून होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
अन्यायाविरुद्धचा लढा आणि जनतेच्या हक्कासाठी पुकारलेल्या या संघर्षाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या:
वन अतिक्रमणधारक: २००५ च्या अगोदरचे असो किंवा नंतरचे, वन अतिक्रमणधारकांना सरसकट पट्टे देण्यात यावेत.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.
शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज सरसकट मुक्त करावे. स्मार्ट मीटर काढण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा-मुरूमगांव राष्ट्रीय महामार्ग क्र. १३० चे पक्के बांधकाम तातडीने पूर्ण करावे.
गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावेत. शासकीय व आश्रमशाळा वसतिगृहातील सुविधा दर्जेदार कराव्यात. धानाला हमीभावाव्यतिरिक्त अतिरिक्त बोनस देण्यात यावा.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, वनहक्कधारक, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा उभारण्यात येत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून जनतेच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या भव्य जनआक्रोश मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.
