गडचिरोलीत जिल्ह्यातील पहिली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी!
जानेवारीपासून एमआरआय सेवा सुरू होणार

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.२४ ऑक्टोबर २०२६)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), गडचिरोली येथे जिल्ह्यातील पहिली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.
सावली तालुक्यातील किसाननगर येथील आकाश गरिचंद मासोळे (वय २७) हे दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला फ्रॅक्चर होऊन मेंदूमध्ये हाडांचे तुकडे आणि रक्तस्राव झाला होता. न्यूरोसर्जन डॉ. आशिष तेलकपल्लीवार यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हाडांचे तुकडे काढले व रक्तस्राव नियंत्रित केला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण शुद्धीवर असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. हेमंत मडावी, डॉ. क्रुणाल चेंकापूरे, डॉ. अक्षय वाघमारे, डॉ. प्रशांत मगदूम यांच्यासह वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.अधिष्ठाता डॉ. एम. फैसल यांच्या नेतृत्वात महाविद्यालयात आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार होत असून, जानेवारीपासून एमआरआय सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या यशाबद्दल डॉ. फैसल यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या सुविधांमुळे गडचिरोलीतील रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.
