वीज समस्यांवरून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा!

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.१५ ऑक्टोबर २०२६)
शेतीपंपांचे भारनियमन, सक्तीचे स्मार्ट मीटर, भरमसाठ वीजबिले, अवाजवी विद्युत दंड तसेच विद्युत वितरण व्यवस्थेतील विविध समस्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंता खांडेकर यांना निवेदन सादर केले. यावेळी विविध मागण्या मांडण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
गडचिरोली हा आदिवासीबहुल आणि उद्योगविरहित जिल्हा असल्याने येथे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत वाढीव वीजबिलांचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिक, गरीब कुटुंबे आणि शेतकऱ्यांवर पडत आहे. शेतीपंपांच्या भारनियमनामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असून, स्मार्ट मीटरसंदर्भातील तक्रारी, वीजबिलांतील अनियमितता आणि विद्युत वितरण सेवेतील अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष महेश विश्वास, संदीप भोवरे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या मांडल्या.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
!!
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने शेतीपंपांचे भारनियमन तातडीने बंद करावे, सक्तीचे स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय रद्द करावा, सर्वसामान्य नागरिकांना अवाजवी वीजबिले देणे थांबवावे आणि नागरिकांकडून जबरदस्तीने विद्युत दंडाची रक्कम वसूल करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
!!
जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या वीजविषयक समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अन्यथा गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावागावांत व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने देण्यात आला.
अधीक्षक अभियंत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
!!
वीजबिलांच्या वाढत्या तक्रारी आणि विद्युत वितरणासंबंधी समस्या सोडविण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी घोट येथे वीजबिल व विद्युत समस्या निवारण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांकडून देण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.
