जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : कोटगल बॅरेजच्या मोबदल्यात दुजाभावाचा आरोप

गोगाव-अडपल्लीच्या शेतकऱ्यांची एकरी २५ लाखांची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.११ ऑक्टोबर २०२६)

कोटगल (Kotgal) बॅरेज प्रकल्पांतर्गत गोगाव आणि अडपल्ली येथील शेतजमिनींच्या भूसंपादनासाठी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या मोबदल्यात मोठी तफावत असल्याचा गंभीर आरोप बाधित शेतकऱ्यांनी आज (दि. ११ ऑक्टोबर) रविवार ला गोगाव स्थित आय फार्म येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन केला आहे. काही शेतकऱ्यांना प्रति एकर ३० ते ३५ लाख रुपये मूल्यांकन मंजूर झाल्याची माहिती समोर येत असताना, गोगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांना केवळ ६ ते ७ लाख रुपये, तर अडपल्ली येथील शेतकऱ्यांना १४ ते १५ लाख रुपये प्रति एकर मोबदला प्रस्तावित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या कथित तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, दोन्ही गावांतील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट किमान २५ लाख रुपये प्रति एकर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात गोगाव व अडपल्ली येथील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करून भूसंपादनाच्या मूल्यांकनातील तफावत दूर करण्याची मागणी केली आहे. भूसंपादन विभाग, गडचिरोली यांच्याकडून १ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त झालेल्या नोटिसांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

कोटगल बॅरेज प्रकल्पासाठी दोन्ही गावांतील शेतजमिनींचे भूसंपादन करण्यात येत आहे. मात्र, मोबदल्याचे मूल्यांकन करताना गावानुसार आणि शेतकऱ्यानुसार मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अडपल्ली येथील सामान्य शेतकऱ्यांना १४ ते १५ लाख रुपये प्रति एकर, तर गोगाव येथील शेतकऱ्यांना केवळ ६ ते ७ लाख रुपये प्रति एकर मोबदला प्रस्तावित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जमिनीची सुपीकता, भौगोलिक परिस्थिती आणि सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत हा मोबदला अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

काही शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह
!!
याच भूसंपादन प्रक्रियेत अडपल्ली येथील एक-दोन शेतकऱ्यांना तसेच गोगावमधील काही शेतकऱ्यांना ३० ते ३५ लाख रुपये प्रति एकर या दराने मूल्यांकन मंजूर झाल्याची माहिती असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अडपल्ली येथील एका शेतकऱ्याच्या २० आर क्षेत्राच्या जमिनीसाठी ६५ लाख रुपयांचे मूल्यांकन मंजूर झाल्याची माहिती मिळाल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या दाव्यांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे या प्रकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरते.

एकाच प्रकल्पासाठी आणि जवळपास समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या जमिनींचे भूसंपादन होत असताना मोबदल्याच्या रकमेत एवढी मोठी तफावत का, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. काही शेतकऱ्यांना अधिक मोबदला आणि बहुतांश सामान्य शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असल्यास त्यामागील निकष स्पष्ट करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.मूल्यांकनातील तफावत आढळल्यास नियमानुसार आवश्यक सुधारणा करून बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
!!
भूसंपादनामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असलेली जमीन संपादित होत असताना त्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मूल्यांकनातील तफावत दूर करावी. सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गोगाव व अडपल्ली येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला राजु भाऊ ईटणकर,शंकर सालोटकर, जितेंद्र मुप्पीडवार,विनोद म्हशाखेत्री,नरेंद्र म्हस्के,राजेश वाणी,इशान्य भोयर,प्रमोद भाकरे,प्रभाकर चुधरी, यांचेसह अनेक बाधित अडप्पली व गोगाव येथील शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button