
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.१५ ऑक्टोबर २०२६)
सेवा संकल्प अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती गडचिरोली आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना, तालुका गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर वीर बाबुराव शेडमाके सभागृह पंचायत समिती गडचिरोली येथे आयोजित केले होते.सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील व सहायक गटविकास अधिकारी लीलाधर बेडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरामध्ये एकूण ३० इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते. त्यामुळे अशा उपक्रमांमधून समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट होते.
एकूण ३० रक्तदात्यांच्या सहभागामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमातून रक्तदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.
