गडचिरोली : २८ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.२७ ऑक्टोबर २०२६)
प्रादेशिक मौसम केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
तारखेनुसार हवामानाचा अंदाज
!!
२७ ऑक्टोबर — येलो अलर्ट : जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबर — ऑरेंज अलर्ट : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
२९ ऑक्टोबर — येलो अलर्ट : बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
३० ऑक्टोबर : तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांचा कडकडाट होत असताना घ्यावयाची खबरदारी
!!
– मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे. विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा.
– बाल्कनी, छत, घराबाहेरील ओटा तसेच उघडी दारे व खिडक्यांजवळ थांबू नये.
– उंच झाडांखाली, धातूच्या मनोऱ्याजवळ किंवा तात्पुरत्या तंबू व शेडमध्ये आसरा घेऊ नये.
– तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.
– लँडलाईन फोन व विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. पाण्याचे नळ आणि पाइपलाइन यांना स्पर्श करू नये तसेच शॉवरखाली आंघोळ करू नये.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि संबंधित विभागाच्या सूचनांनुसार शेतीकामाचे नियोजन करावे. नागरिकांनी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
!!
दूरध्वनी : ०७१३२-२२२०३१ / २२२०३५
मोबाईल : ९४२३९११०७७ / ८२७५३७०५०८ / ८२७५३७०२०८
