Uncategorizedविशेष
६५ वर्षीय महिलेचे जटा निर्मूलन करण्यात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आले यश
सांगली (दि.१९ नोव्हेंबर)
वाळवा येथील श्रीमती सुजाता शामराव पाटील (६५ वर्षे) यांचे जटा निर्मूलन करण्यात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
श्रीमती सुजाता पाटील यांच्या गेल्या तीन चार वर्षापासून जटा वाढल्या होत्या. समाजामध्ये अज्ञान, अंधश्रध्दा आणि आरोग्य याबाबत अनास्था असल्यामुळे जटा वाढल्या जातात. महा. अं नि स कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यावर कुटुंबियांचे व श्रीमती पाटील यांचे प्रबोधन केले असता ते जटा निर्मूलन करण्यास तयार झाले. महा. अं नि स चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा.नितीन शिंदे, प्रा.सतीश चौगुले, प्रा.रामभाऊ घुले, राजेंद्र मोटे यांनी श्रीमती सुजाता पाटील यांचे जटा निर्मूलन केले. जटा निर्मूलनसाठी लालासाहेब महादेव पाटील, सुरेश शामराव पाटील, सौ.पूनम सुरेश पाटील, योगेश मोटे यांचे सहकार्य लाभले. वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील (बाबा) यांनी श्रीमती सुजाता पाटील यांचा जटा निर्मूलन केल्याबद्दल सत्कार केला. यावेळी अभिजित भिलवडे, अरुण पाटील उपस्थित होते. ‘महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने संपूर्ण राज्यभर सातत्याने पाठपुरावा करून हजारो व्यक्तींचे जटा निर्मूलन केले आहे. मानसिक गुलामगिरीतून व अंधश्रद्धेतून जटा वाढविल्या जातात. जटाधारी व्यक्तीचे यामुळे खूप मोठे नुकसान होते, जटांच्यामुळे व्यवस्थीत कामेही करता येत नाहीत. त्यामुळे आपल्या परिसरातील जटाधारी व्यक्तीची माहिती समितीला द्यावी’ असे आवाहन संजय बनसोडे यांनी केले आहे. समीतीद्वारे जटाधारी व्यक्ती व कुटूंबीयांचे प्रबोधन करुन कुटुंबीयांच्या संमतीनेच जटांचे निर्मूलन करण्यात येते. जटांचे निर्मूलन केल्यानंतर त्या व्यक्तीचे वैयक्तिक अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसल्यामुळे जटा निर्मूलन करण्यासाठी जटाधारी व्यक्तींनी पुढे आले पाहिजे असे मत महा अंनिस चे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर यांनी व्यक्त केले आहे.
जाहिरात
