गडचिरोली – चामोर्शी मार्गावर भीषण अपघात ५ ठार, ६ जख्मी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २९ मार्च)
गडचिरोली–चामोर्शी मार्गावर आज सायंकाळी भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दि. २९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता कुरुड–कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील धोकादायक वळणावर घडली. रामपूर येथून लग्न समारंभ आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतणाऱ्या MH ४६ P ५३९२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनात एकूण १६ प्रवासी होते. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असलेल्या MH १५ CK ५००५ क्रमांकाच्या प्रवासी वाहनाशी वळणावर जोरदार धडक झाली.
या भीषण धडकेत स्कॉर्पिओ वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लग्न समारंभातून परतणाऱ्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
