‘महाराष्ट्र शासन’ पाटीच्या कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक
अन्नसुरक्षा अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि. ७ ऑक्टोबर २०२६)
गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील बाबूराव शेडमाके चौकात बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीवरील दाम्पत्याला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४६ डीए ७३५३ असून, दुचाकी क्रमांक एमएच ३३ डी ८५२१ आहे. दुचाकीवरील दाम्पत्य चौकातून रस्ता ओलांडत असताना सेमाना दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले.
त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. नागरिकांनी वाहनचालकाला थांबवून पोलिसांना माहिती दिली. वाहनचालक विकास सोनवणे हे अन्न व औषध प्रशासन विभागात अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर विकास सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. अपघातातील जखमी दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या दुखापतींचे गांभीर्य वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त चारचाकी वाहनाच्या पुढील व मागील बाजूस ‘महाराष्ट्र शासन’ असा उल्लेख असलेल्या पाट्या लावण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या पाट्यांचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला होता, याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
विकास सोनवणे यांची काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथून गडचिरोली येथे बदली झाल्याची माहिती असून, त्यांच्याकडे चामोर्शी तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्याचे सांगितले जात आहे.
