गडचिरोली : १५ अत्याधुनिक ‘शिवाई’ ई-बसेस व ई-चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

लोकशाही न्युज, गडचिरोली (१२ नोव्हेंबर २०२६)
गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली आगारात दाखल झालेल्या १५ अत्याधुनिक ‘शिवाई इलेक्ट्रिक’ बसेसचा भव्य लोकार्पण व पूजन सोहळा तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या ई-चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन गडचिरोली बस स्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळत आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागासह प्रमुख शहरांशी दळणवळण अधिक सुलभ व्हावे, यासाठी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, गडचिरोली आगारासाठी १५ अत्याधुनिक ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस मंजूर होऊन प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्या आहेत.
‘या’ प्रमुख मार्गांवर धावणार शिवाई ई-बसेस
!!
नव्याने दाखल झालेल्या या पर्यावरणपूरक बसेसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी, सुरक्षित आणि गारेगार होणार आहे. या बसेस प्रामुख्याने खालील चार महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत:
गडचिरोली – नागपूर
गडचिरोली – चंद्रपूर
गडचिरोली – अहेरी
गडचिरोली – मुरुमगाव
आधुनिक ई-चार्जिंग स्टेशनची सुविधा
!!
इलेक्ट्रिक बसेसच्या सुरळीत आणि अखंडित संचालनासाठी गडचिरोली बस स्थानक परिसरात सुसज्ज असे ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. आज बसेसच्या लोकार्पणासोबतच या चार्जिंग स्टेशनचेही रीतसर उद्घाटन करण्यात आले. यामुळे बसेसच्या चार्जिंगची कायमस्वरूपी आणि वेगवान सुविधा उपलब्ध झाली असून, भविष्यातील हरित वाहतुकीचा पाया भक्कम झाला आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
!!!
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार मिलिंद नरोटे गडचिरोली विधानसभा,भाजयुमोचे हरिश माकडे, शुभम बाळेकरमकर, यश कोंडावार आणि सतीश पेंडोरकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये एसटी महामंडळाच्या सनियंत्रण समिती क्र. ०३ चे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, प्रादेशिक अभियंता महेंद्रकुमार नेवारे, गडचिरोली विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडस्कर, यंत्र अभियंता छगन डिवसे, विभागीय वाहतूक अधिकारी कन्हैया भोगे आणि गडचिरोली आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांचा समावेश होता.
गडचिरोली सारख्या जिल्ह्यात अत्याधुनिक ई-बसेस आणि चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यामुळे प्रवासी वर्गातून मोठे समाधान व्यक्त केले जात असून, जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला यामुळे निश्चितच नवी गती प्राप्त होणार आहे.
