गर्देवाडा परिसरात माओवाद्यांचे स्फोटक साहित्य व अग्निशस्त्रे हस्तगत

लोकशाही न्युज,गडचिरोली / एट्टापल्ली(दि.१७ नोव्हेंबर २०२६)
गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात येत असून, नागरिक आता माओवादाच्या दहशतीतून मुक्त होत आहेत. भूतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहोचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य गोपनियरित्या जमिनीत लपवून ठेवले जात होते. नक्षल सप्ताह व निवडणुकांसारख्या प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी याचा वापर केला जाई. याच पार्श्वभूमीवर, आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली पोलीस दलाने प्रभावी कारवाई करत माओवाद्यांचे लपवून ठेवलेले साहित्य जप्त केले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,एट्टापल्ली तालुक्यातील पो.स्टे. गर्देवाडा हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य आणि शस्त्रे लपवून ठेवली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली व प्राणहिता येथील ०५ तुकड्या आणि बीडीडीएसचे (BDDS) ०२ पथक तातडीने शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.
खालील साहित्य व शस्त्रे जप्त
!!
अग्निशस्त्रे: ०२ नग (०१ नग १२ बोर रायफल आणि ०१ नग एअर गन रायफल)
जिवंत काडतुसे: ३१ नग (१३ नग .३०3 आणि १८ नग ८ एम.एम.)
ग्रेनेड व लाँचर्स: ०३ नग ग्रेनेड, १८ नग बिजीएल सेल आणि ०२ नग बिजीएल लाँचर
इतर स्फोटके व साहित्य: १० नग डेटोनेटर, २१ नग सुराका सेल, ०१ नग होंडा कंपनीचे इलेक्ट्रिक , २२ नग वायर बंडल आणि मोठ्या प्रमाणावर इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. हर्षवर्धन बि. जे., आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनिल उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली. या यशस्वी कारवाईत सहभागी विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंट सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी विशेष कौतुक केले आहे.
