दोन महिन्यांत गडचिरोलीचे प्रश्न सोडवा, अन्यथा जिल्हाभर चक्काजाम! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ठाकरे गटाचा निर्वाणीचा इशारा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ नोव्हेंबर २०२६)
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन मांडून येत्या दोन महिन्यांत हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
मुदतीत ठोस कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशाराही यावेळी देण्यातआला. गडचिरोली हा आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्हा असून येथील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
!!
आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनहक्क पट्टे तातडीने वितरित करावेत.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ बोनस जाहीर करावा. शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावीत. मुरूमगाव-धानोरा-गडचिरोली मार्गासह जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून नवीन रस्ते बांधावेत. जिल्ह्यात वाढलेला वन्यप्राण्यांचा वावर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे.
पवन गेडाम, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा)
!!
जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. शासनाने दोन महिन्यांत मागण्या मान्य न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.
यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे, माजी जिल्हा संघटक विलासजी ठोंबरे, तालुकाप्रमुख मनोज पोर्टे, गणेशामजी कोलते, गोविंदाजी ब्राह्मणवाडे, संतोष लोणबले, किरण शेडमाके, विलास ठाकरे, आशिष काडे, सदाशिव गाणे, पिल्लारेजी, काळबांडेजी, महिला आघाडीच्या विनुताई ढवगाडे, युवासेना जिल्हाप्रमुख गुणाजी भोरकुटे, उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव सातपुते, शहरप्रमुख अमोलजी कुडमेते, अतुल नैताम, तुषारजी मडावी यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
