पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात गडचिरोलीत अतिक्रमण हटाव मोहीम
२४ तास गजबजणारा इंदिरा गांधी चौक झाला मोकळा

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १८ नोव्हेंबर २०२६):
गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चारही राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने आज (बुधवार, दि. १८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजल्यापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नगरपरिषद प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
!!
गडचिरोली शहरातील चारही राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने रस्ते अरुंद झाले होते. त्यातच शहरातून अवजड वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा व जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे होते.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मोहिमेला वेग
!!
नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान पोटेगाव रोडवरील अतिक्रमण काढून रस्ता चकाचक करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता शहरातील इतर सर्वच प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.


इंदिरा गांधी चौक झाला मोकळा
!!
या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम शहराच्या मध्यवर्ती भागात दिसून आला. चोवीस तास वर्दळ आणि अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक या कारवाईनंतर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाला असून चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन, गडचिरोली
!!
गडचिरोली शहराच्या चारही महामार्गांवरील अतिक्रमण तात्काळ काढून सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात येतील. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
