संकटाच्या काळात माणुसकीचा आधार; माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी खरपुंडी येथे शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन साजरी केली दिवाळी!

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ९ नोव्हेंबर २०२६)
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, स्नेह, आपुलकी आणि माणुसकीच्या नात्यांचा सण! यंदा अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आपलेपणाचा आधार मिळावा, या उदात्त हेतूने राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार माजी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी मौजा खरपुंडी येथे जाऊन शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली.
गडचिरोली तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर बळीराजा अडचणीत सापडला आहे. या काळात राजकीय पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीचे नाते आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे, हा संदेश देत डॉ. अशोक नेते यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी भेटी दिल्या.
दीपावलीच्या मंगलमय पर्वावर खरपुंडी येथील श्री हनुमान मंदिरात डॉ. अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत दीपप्रज्वलन व पूजा-अर्चा करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी ग्रामस्थांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
पूजा-अर्चेनंतर त्यांनी गावातील शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलांची भेट घेतली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप करण्यात आले. डॉ. नेते यांनी स्वतः लहान मुलांसोबत फुलझड्या लावून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. बालगोपालांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साहाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन व प्रशासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास दिला.
या उपक्रमावेळी शक्तीकेंद्र प्रमुख तथा तालुका महामंत्री रमेशजी नैताम, मारोती मोटघरे, माजी सरपंच आनंद नैताम, तुळशीदास टिकले, वासुदेव नैताम, माजी पोलीस पाटील रामभाऊ टिकले, अरुण टिकले, रोशन टिकले, बूथ प्रमुख रवी मोहुर्ले, राहुल वाकडे, सतीश टिकले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खरपुंडी येथील ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
