आरोग्य व्यवस्थेचा बळी २७ वर्षीय महिला व नवजात शिशु
डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांचेवर कारवाई ची मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२४ ऑगस्ट २०२६)
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील एका गरोदर महिलेला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयातून गंभीर अवस्थेत गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसुतीसाठी आणत असताना बाळाने प्रसुतीआधीच जीव गमावला, तर प्रसुतीनंतर मातेनेही उपचाराला प्रतिसाद न देता प्राण सोडले. ही दुर्दैवी घटना रविवार (दि. २३ ऑगस्ट) ला घडली. मृतक महिलेचे नाव जिजा हंसराज सातर (वय २७ वर्ष),जामगिरी, ता.चामोर्शी आहे.
मृतक झालेल्या महिलेचा मृत्यू हा आरोग्य व्यवस्थेचा बळी झाला असल्याने उपचारात हलगर्जी पणा करणाऱ्या डॉ. किलनाके व डॉ. देवरा यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी व सातर कुटुंबियांनी आज (दि. २४ ऑगस्ट) ला कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्यां अमिता मडावी,मृतक महिलेचा पती हंसराज सातर,मृतक महिलेची आई सोनिबाई कंगाले, जाऊ जिजाबाई लोनबले, शरद काशिनाथ कस्तुरे मृतक महिलेचे नातलग पत्रकार परिषदेला हजर होते.
