थकीत बिलांमुळे कंत्राटदाराची आत्महत्या, कंत्राटदार संघटनेचा शासनाविरोधात निषेध
पंधरा दिवसांत थकीत बिले अदा करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२६ ऑगस्ट २०२६)
नांदेड येथील शासकीय कंत्राटदार गजू भाऊ देवकते यांनी शासनाकडून गेल्या चार वर्षांपासून कामांची थकीत बिले मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे. कामांची बिले रखडल्यामुळे व्यापाऱ्यांची देणी, कर्जावरील व्याज तसेच इतर आर्थिक व्यवहार भागविणे अशक्य झाल्याने ते आर्थिक व मानसिक तणावाखाली होते. अखेर या परिस्थितीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने बुधवारी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित होते.
शासनाकडे विविध शासकीय कामांची मोठ्या प्रमाणात बिले थकीत असून, ती वेळेत अदा न झाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने कंत्राटदारांची थकीत बिले तातडीने अदा करावीत. अन्यथा आर्थिक विवंचनेमुळे महाराष्ट्रातील अनेक कंत्राटदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकतात, असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
येत्या १५ दिवसांच्या आत कंत्राटदारांची सर्व थकीत बिले मंजूर करून त्यांची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
