जाहिरात
निधन वार्ता

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील जवानाला आले वीरमरण

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली /कुरखेडा (दि.२४)

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील बिधाननगर येथील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीतील सहकारी जवानाने केलेल्या गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी असलेले जवान सुरेश दुर्गुजी अंबाडार(३७) या जवानाला वीरमरण आले.

पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्ह्यातील बिधाननगर येथे सीमा सुरक्षा दलाच्या ११९ व ७१ क्रमांकाच्या बटालियनची छावणी आहे. गुरुवारी(दि.२३) दुपारी ७१ क्रमांकाच्या बटालियनमधील शिवम मिश्रा नामक जवानाने अचानक दोन जवानांवर गोळीबार केला. यात सुरेश अंबाडार व अजयकुमार सिंग (५१) (रा.मांझी, बिहार) हे दोन जवान शहीद झाले, तर विकास ब्रम्हा(४४),रा.मोहंदा(पश्चिम बंगाल) हे गंभीर जखमी झाले.

मरारटोला गाव शोकमग्न
!!
सुरेश अंबाडार यांच्या निधनाचे वृत्त कळताच मरारटोला गाव शोकमग्न झाले. शहीद सुरेश अंबाडार याच्या पश्चात पत्नी प्रियंका, २ वर्षांची मुलगी युक्ती, आई, वडील व दोन भाऊ आहेत. पत्नी ही मुलीसह आपल्या बहिणीकडे गडचिरोली येथे वास्तव्यास आहे. २०१२ मध्ये सुरेश अंबाडार बीएसएफमध्ये दाखल झाले. त्यानंतर २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला. परंतु विवाहाच्या अवघ्या सहा वर्षांतच त्यांना वीरमरण आल्याने अंबाडार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुरेश एकटेच होते कमावते
!!
सुरेश अंबाडार यांना वृद्ध आई, वडील व दोन लहान भाऊ आहेत. अवघ्या सव्वा एकर शेती व मजुरीवरच वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातच सुरेश यांना नोकरी लागल्याने तेच कुटुंबाचा आधार होते. परंतु हा आधारही काळाने हिरावून घेतला.

शनिवारी होणार अंत्यसंस्कार
!!
शहीद जवान सुरेश अंबाडार यांच्या अंत्यसंस्कारासंबंधी माहिती देण्यासाठी आज कुरखेडा तहसील कार्यालयातील अधिकारी आणि पोलिस मरारटोला येथे जाऊन आले. सुरेश यांचे पार्थिव शनिवारी २५ जुलैला मरारटोला येथे आणण्यात येणार असून, दुपारी ३ वाजता त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button