गडचिरोली : आरोग्य व्यवस्थेचा बळी, ८ दिवसांत पुन्हा माता-बाळाचा मृत्यू
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; आजाद समाज पार्टीचा इशारा

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.३१ ऑगस्ट२०२६)
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, अवघ्या ८ दिवसांत आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एका निष्पाप मातेचा व बाळाचा जीव गेला असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे. नाजुका दिवाकर राऊत (वय. २८ वर्ष ) रा. चकपिरंजी यांना २८ ऑगस्ट ला प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल केले असता तिच्यासह बाळाचा मृत्यू झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. वारंवार होणाऱ्या मृत्यूंनंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठोस उपाययोजना करत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
निलंबन ही कारवाई नव्हे!
!!!
दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई करून प्रकरण मिटवण्याचा प्रकार आता बंद करा. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.
निलंबनानंतर काही महिन्यांतच अधिकारी पुन्हा सेवेत येत असतील, तर त्यांना कायद्याची भीती कशी राहणार? याच कारणामुळे प्रशासनातील काही अधिकारी माजले असून, त्यांच्या हलगर्जीपणाची किंमत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपल्या जीवाने मोजावी लागत आहे, असा गंभीर आरोप बन्सोड यांनी केला.
आमदार महोदय काय फक्त रील व फोटो बनवून मिरवायला आहेत का?
!!
गोरगरीब जनतेचे जीव रोज जात असतील, तर आमदार महोदय केवळ रील आणि फोटो टाकून मिरवण्यासाठी आमदार झाले आहेत काय? असा थेट सवाल आजाद समाज पार्टीने उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, ८ दिवसांपूर्वीच आरोग्य प्रशासनाला धारेवर धरून तातडीने कारवाई करण्याऐवजी व्यवस्था सुधारण्यासाठी धोरण ठरविण्याकरिता बैठक घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्या घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला.
जर बैठका, घोषणा आणि आश्वासने देऊनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसेल, तर या निष्क्रियतेची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी स्वीकारली पाहिजे.
व्यवस्था सुधारली नाही तर तुमचाच राजीनामा मागू
!!!
आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि दोषींना मिळणारे संरक्षण यापुढे आजाद समाज पार्टी खपवून घेणार नाही.
आरोग्य व्यवस्था सुधारली नाही, दोषींवर फौजदारी कारवाई झाली नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ सुरूच राहिला, तर संबंधित आमदारांच्याच राजीनाम्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा आजाद समाज पार्टीने दिला आहे.
तसेच चामोर्शी येथील जिजा सातर प्रकरण असो किंवा आताचे नाजुका राऊत प्रकरण असो, आमदार महोदयांनी आता पुढाकार घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणावा, असे खुले आव्हान आजाद समाज पार्टीने दिले आहे.
