गडचिरोली : राज्यसभा खासदार माया इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी जमातीची सामाजिक बैठक संपन्न

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १५ जून)
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील समस्त आदिवासी जमातीची सामाजिक बैठक नवनियुक्त राज्यसभा खासदार श्रीमती माया इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल माया इवनाते यांचा आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यानंतर आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत आदिवासी समाजासमोरील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व रोजगारविषयक अडचणी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासी युवक-युवतींसाठी कौशल्य विकासाच्या संधी, दुर्गम भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा, मूलभूत पायाभूत सुविधा तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर विस्तृत विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी बदलत्या काळात आदिवासी समाजाचे अस्तित्व, संस्कृती आणि परंपरा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात समाजाला सक्षमपणे पुढे नेण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाच्या प्रश्नांवर संघटितपणे पाठपुरावा करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त राज्यसभा खासदार माया इवनाते यांनी आदिवासी समाजाच्या अपेक्षा, समस्या व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत त्या संसदेच्या माध्यमातून शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या हक्क, विकास आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, समाजाशी सातत्यपूर्ण संवाद कायम ठेवून त्यांच्या समस्या व मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीस माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माधव गावळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच आदिवासी समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे या बैठकीत एकूण २२ आदिवासी संघटना व विविध ग्रामसभांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळे ही बैठक आदिवासी समाजाच्या एकजुटीचे, सामाजिक ऐक्याचे आणि समाजहिताच्या प्रश्नांवर सामूहिकपणे मार्ग काढण्याच्या सकारात्मक भूमिकेचे प्रभावी प्रतीक ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अमरसिंग गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती पुष्पलता कुमरे यांनी केले.
