सत्यशोधक पद्धतीने पार पडला गडचिरोली शहरात विवाह सोहळा,विवाहाची सर्वत्र चर्चा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२४ मार्च)
गडचिरोली शहरात दि,१९ मार्च रविवार ला स्थानिक सांस्कृतिक भवन आरमोरी रोड गडचिरोली येथे विलास निंबोरकर गडचिरोली यांची मुलगी पूजा व हरिदास तम्मेवार अहमदपूर यांचा मुलगा गिरीश यांचा विवाह सोहळा सत्यशोधकी पद्धतीत पार पडल्याने सर्वत्र त्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे.

लग्ना निमित्य आलेल्या अंनिस च्या मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया..
श्री पुरुषोत्तम बी. ठाकरे, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस ,जिल्हा शाखा गडचिरोली.
महाराष्ट्र अंनिसच्या राज्य वैज्ञानिक जाणिवा विभागाचे मा. विलास निंबोरकर यांनी विवेकी विचारांवर कायम राहुन व अनावश्यक कर्मकांडांना फाटा देऊन आपली मुलगी कु पुजा हीचा विवाह याच चळवळीमधील राज्य कार्यकारिणी मधील एका सामान्य कार्यकर्ता असलेल्या श्री हरिदासजी तम्मेवार यांचा मुलगा चि. गिरीश यांचेशी अत्यंत साध्या व सत्यशोधकी पद्धतीने लावून एक नविन आदर्श बहुजन समाजासमोर ठेवलेला आहे. कोणताही नविन बदल घडवून आणतांना घरच्या महिला सदस्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्यांच्या या निर्णयावर त्यांची पत्नी सौ. महानंदा निंबोरकर व सर्व सदस्य यांनी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले व त्यांना मोलाची साथ दिली यासाठी त्यांचे अभिनंदन .येणा-या काळात सर्वांनी त्यांचे हे आदर्श उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे अशी अपेक्षा आहे.
उपेंद्र रोहनकर गडचिरोली शहर कार्याध्यक्ष
“सत्यशोधकी” विवाहाची जनमानसात प्रशंसा
“विवाह” म्हटला की दोन अनोळखी जीवाचे मिलन.वर- वधुच्या मित्रमैत्रिणीना आनंदाची पर्वणी.पण घरच्या प्रमुख व्यक्तीला किती त्रास.एकदाचे लग्न पार पडले की मगच सुटकेचा निस्वास. एका दिवसाचा कार्यक्रम दोन महिन्यांपासूनची तयारी. खरेच आहे म्हणतात ना, “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे”. साखरपुडयापासून तर विवाहापर्यंत घरची प्रमुख मंडळी ह्या कामात व्यस्त असतात. लग्नपत्रिका, कपडे खरेदी, प्रीवेडिंग, व्हिडीओशुटींग, हॉल, डीजे, घोडावाला, गाड्या, कॅटर्सवाला ह्याची जुळवाजुळव. ह्या सर्वांना आधीच ऍडव्हान्स द्या. नंतर लग्न. वर-वधूच्या वडिलांची किती तारांबळ! मग ह्या सर्व सोंगाना बाजूला ठेवलं तर,,,,,,! तर पैशाची बचत आणि त्रास पण वाचणार. मग काय हरकत आहे. जातीधर्माचे बंधन झुगारून देत होणाऱ्या विवाहाला समाजाचा, नातेवाईकाचा रोष सहन करावा लागतो. पण अशा युगुलास हिम्मत देत त्यांचा “सत्यशोधकी” विवाह लावून देण्याचा उपक्रम आज महाराष्ट्रात स्तुत्य ठरत आहे.
असाच एक विवाह गडचिरोली येथे सांस्कृतिक सभागृहात नुकताच पार पडला. त्या विवाहाची जण माणसात सर्वत्र वाहवा केली जात आहे. लग्नात होणाऱ्या अवास्तव खर्चाला फाटा देत ना डीजे, ना भटजी, ना कोणता विधी. अत्यंत साध्या पध्दतीने, महात्मा जोतिबा फुले , सावित्रीमाई फुले, कर्मयोगी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन गडचिरोली येथील सेवानिवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते, वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह श्री.विलास नानाजी निंबोरकर ह्यांची मुलगी पूजा हिचे लग्न लातूर जिल्ह्यातील अहमदपुर येथील श्री. हरिदास तम्मेवार यांचा मुलगा गिरीश ह्याच्याशी “सत्यशोधकी”पद्धतीने पार पडला.
विशेष म्हणजे दोन्ही व्याही हे महा अंनिस संघटनेत पूर्णवेळ काम करतात. ह्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष श्री.माधवराव बावगे, राज्य प्रधानसचिव श्री. गजेंद्रजी सुरकर, गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी व सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह आटोपून कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या प्रेरणा मेळाव्यात संघटनेची बांधिलकी जोपासत वधूचे वडील श्री विलास निंबोरकर व वराचे वडील श्री हरिदास तम्मेवार यांनीही मेळाव्याला हजेरी लावली हे विशेष .. लग्नाची संपुर्ण कार्यवाही आदरणीय बावगे सर यांनी पार पाडली. गडचिरोली शहरात या पद्धतीने झालेला सत्यशोधक विवाह सोहळा पहिलाच असल्याने याची सर्व दूर स्तुती होत आहे.
गोविंदराव ब्राम्हणवाडे निधी संकलन विभाग कार्यवाह.
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पचे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर यांनी आपल्या मुलीचे लग्न महापुरुषांच्या विचार सरणीला यापूर्वी कधी असं गडचिरोली जिल्ह्यात लग्नाचे कार्य झालेले नाही आणि हे पहिलंच असं अबूतपूर्व असं कार्य झालेलं आहे तरी यांना माझ्याकडून अभिनदन व हार्दिक शुभेच्छा देत आहोत..
डॉ शिवनाथ कुंभारे, अध्यक्ष अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा गडचिरोली तथा जेष्ठ सल्लागार महा अंनिस जिल्हा शाखा गडचिरोली
लग्नाची वरात शहापूर ला नयनात आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत आम्ही पुजा आणि इतर सर्वांना सायंकाळी साडेपाच च्या सुमारास गडचिरोली वरून निरोप दिला. टाटा बाय बाय घेत आमच्या दृष्टीसमोरून कसे काय निघून गेले ते कळलेच नाही. आता सर्वांना घराकडची ओढ लागली होती. त्यामुळे मंगलकार्यालयातील सर्व वस्तूंची आवराआवर करून आम्ही घरची सगळी मंडळी ज्यांना जसे जमेल तसे हातात जे सापडेल ते गोळा करून घरून आणलेल्या वस्तू काही विसरल्या तर नाही ना याची खात्री करून घरी आलो. परत तेच. इकडे घरी सुद्धा अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. पाहुण्यांच्या मदतीने त्यांचीही आवराआवर झाली. मंगलकार्यालय घराजवळ असल्यामुळे आचाऱ्याने जेवणातील शिल्लक राहिलेले साहित्य घरी नेण्यासाठी सांगितल्याने आमचा रात्री अन्न शिजविण्याचा त्रास वाचलेला होता. मी दिवसभर कामात गुंतून असल्यामुळे मला बराच थकवा आलेला होता. म्हणून मी आराम करण्यासाठी बेडवर पडलो. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजायला लागली. वरात चंद्रपुरला पोहचली आणि चहा घेण्यासाठी एका ढाब्यावर थांबलेलो आहे म्हणून माझ्या लहान मुलीचा म्हणजे प्रियंकाचा नुकताच फोन येऊन गेला होता. आणि अर्ध्या एक तासाच्या अंतराने परत फोन आल्याने आता हा फोन कोणाचा असेल अशी शंका व्यक्त करत मोबाईल हातात घेतला आणि पहातो तर तो डॉ शिवनाथ कुंभारे साहेब यांचा. यांनी आता हा फोन कशासाठी केला असेल? अशी सहज शंका आली. आणि काॅल उचलला व नेहमीप्रमाणे डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेब “जयगुरू” म्हणताच त्यांनीही प्रतिक्रीयेदाखल “जयगुरू” म्हणत प्रतिसाद दिला. आणि डॉक्टर साहेब बोलायला सुरुवात केली. निंबोरकरजी तुम्ही खूप धाडस केला. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन. लोक खूप बोलतात पण कर्मकांडांना जेव्हा फाटा द्यायची पाळी येते तेंव्हा मात्र काहीतरी निमित्त पुढे करून परंपरागत पद्धतीने विवाह पार पाडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला घरच्यांनी असे असे करावेच लागते असा काही आग्रह धरला नाही का? मी म्हटलं, माझ्या कार्याविषयी व आचार विचाराविषयी घरच्यांना बऱ्यापैकी कल्पना असल्याने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण मी, ते आपल्याला करायचे नाही म्हणताच, बरं ठीक आहे. म्हणून काही अनावश्यक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी मला घरूनही प्रतिसाद मिळाला. तेव्हा डॉक्टर साहेबांनी माझ्या अर्धांगिनीचे म्हणजेच सौ महानंदाचेही खुप कौतुक केले. महानंदाने तुमच्या कार्यात मोठाच हातभार लावला म्हणून हे शक्य झाले. डीजे, भटजी, मंगलकार्यालयातील कर्णकर्कश आवाज करणारे साऊंड, नसल्याने व वेळेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने संत महापुरुषांच्या विचारांशी सुसंगत असा विवाह लावल्यामुळे अनेकांनी या लग्नाची प्रशंसा केली. व्वा! खूप छान झाले. असे म्हणत असताना त्यांना एका पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला आणि ते त्याच्याशी बोलू लागले. मी काही वेळ वाट पाहीली आणि काॅल बंद करून झोपी गेलो.
मारोती दुधबावरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड जिल्हा गडचिरोली.
सर्वप्रथम निंबोरकर व तम्मीवार परिवारांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन! हा आगळा वेगळा सत्यशोधकी पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला. आम्ही मराठा सेवा संघाचे लोक पण शिव विवाह सोहळे लावत असतो. भट मुक्त आणि भयमुक्त व विवेकी जीवन जगणे हे आज एक चॅलेंज म्हणून समस्त बहुजन समाजासमोर उभे आहे. पूजा व गिरीश यांनी पण कोणताही बडेजाव किंवा इव्हेंट्स म्हणून न पाहता याकडे पवित्र सोहळा म्हणून पाहून खऱ्या अर्थाने एक आदर्श निर्माण केला आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण सांगितले आहे की, शुद्ध हवा पाणी ऋतू, हाची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही ll , जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितला आहे की, l l बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ll परत या दोन्ही परिवाराचे व नवरा मुलगा गिरीश आणि नवरी मुलगी पुजा यांना खूप खूप सदिच्छा देऊन त्यांचे मंगल चिंतीतो. जय जिजाऊ ….
विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष, प्रा विलास पारखी जिल्हा प्रधान सचिव शाखा गडचिरोली
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या म्हणीचा अर्थ सार्थकी लावत महा अंनिस चे कार्यकर्ते श्री विलास निंबोरकर व श्री हरिदास तम्मेवार या परीवारांनी आपल्या मुला मुलीचे सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून परिचय दिला. या मंगल कार्याला दोघांच्याही घरातून महिला मंडळ व कुटुंबातील इतर सदस्यांकडून सहकार्य मिळाले म्हणूनच हे शक्य झाले. शिवाय वधू आणि वर उच्च विद्या विभूषीत असतांनाही त्यांनी देखील या साध्या सोप्या पद्धतीने पार पडणाऱ्या विवाहाला संमती दर्शवली. म्हणून सर्वांचे प्रशंसा करावी तेवढे कमीच आहे. नवविवाहित दांपत्यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
मा रोहिदास राऊत जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली.
अंंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री विलास निंबोरकर यांच्या मुलीचा विवाह सत्यशोधक पद्धतीने नुकताच पार पडला . ही बाब निश्चितच अभिनंदनीय व प्रेरणादायी आहे.
अलीकडे समाजात धार्मिक कट्टरता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना कुठलेही अवडंबर व सनातन विधी न करता अशा प्रकारे विवाह घडवून आणणे हे काम धारिष्ट्याचे आहे व हे धारिष्ट्य निंबोरकर परिवाराने दाखविले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
निंबोरकर व तम्मेवार कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन करतो तसेच नव विवाहित दांपत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो .
निंबोरकर सरांचे हे ऐतिहासिक पाऊल समाजाला दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
