जाहिरात
ताज्या घडामोडी

२७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २६ जुलै):

कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी २७ वा कारगिल विजय दिवस रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे विविध देशभक्तिपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोलीतील कारगिल स्मारक हे जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जाते. या स्मारकाच्या उभारणीसाठी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांनी सन २००० पासून तब्बल २२ वर्षे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा, पायपीट आणि अथक प्रयत्न केले. त्यांच्या या दीर्घ संघर्षानंतर २०२२ मध्ये गडचिरोली शहरात शहीद वीर जवानांच्या स्मृती जपणारे हे स्मारक साकार झाले. या कार्याचा सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात विशेष गौरव केला. विशेष म्हणजे, कारगिल चौक येथे गेल्या २७ वर्षांपासून कारगिल विजय दिनानिमित्त शहीद वीर जवानांना मानवंदना अर्पण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कारगिल विजय रॅलीने झाली. या रॅलीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह शालेय विद्यार्थी, नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यानंतर शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. अशोक नेते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे जनरल मॅनेजर लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे सिनिअर जनरल मॅनेजर श्री. कृष्णा रेड्डी, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रणोती सागर निंबोरकर, होमराज डोनाळकर, व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वीर जवानांना आदरांजली वाहिली.

कारगिल स्मारक समितीचे प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, ऋषी वंजारी (से.नि.), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), हवालदार कैलास सिडाम (नि.) तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, गणमान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button