विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्हा बंद

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२३ जुलै)
सर्व तालुका व ग्रामीण भागात सुद्धा शाळा महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन
दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत दि. २३ जुलै २०२६ रोजी गडचिरोली जिल्हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी हा बंद संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उ.बा. ठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), आजाद समाज पार्टी, बीआरएसपी, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष तसेच विविध विद्यार्थी व सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
