गडचिरोली येथील नगररचना साहाय्यक संचालक यांना सुपारी देऊन सासऱ्याच्या हत्ये प्रकरणी अटक

लोकशाही न्युज, (दि,८ जून)
नागपूर येथील वडिलोपार्जित मालमतेच्या वादातून सासऱ्याची कारने धडक देऊन हत्या घडवून आणण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात आरोपी असलेली गडचिरोली येथील नगररचना सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

(सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करण्यामागे मुख्य आरोपी असलेल्या गडचिरोली येथील नगर विकास रचना साहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार)
नागपूर शहरातील शुभनगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) यांचा २२ मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे ३०० कोटीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, डॉ. मनीष, सून अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) व मुलगी आहे.पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नीचे ऑपरेशन झाल्याने ते दवाखान्यातून मुलीच्या घरी जात असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबत अजनी पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र पुरुषोत्तम यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यामुळे तपासाला वेग आला. तपासाअंती पोलिसांनी त्यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळल्याने चौकशी केली असता, सचिन धार्मिक व नीरज निमजे उर्फ नायटी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी पुट्टेवारची हत्या केल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, आरोपीनी दिलेल्या बयाणानुसार या हत्येमागे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून व डॉ. मनीष पुट्टेवार यांची पत्नी अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) यांनी चालक सचिनला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब स्पष्ट झाली.
या घटनेत पुट्टेवार यांच्या हत्येसाठी आरोपीने जुन्या कारची खरेदी केली होती. आरोपीना हत्या करण्यासाठी पैसेही दिले होते. हत्येचा कट रचणारी गडचिरोली येथील नगर रचनाकार सहाय्यक संचालक अर्चना पुट्टेवार(पार्लेवार) हिला हत्येची सुपारी दिल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
