गडचिरोली : शॉर्टकट जीवावर बेतू शकतो; ‘यू-टर्न’चा वापर करा!
शहर वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ७ ऑक्टोबर २०२६)
शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. निर्धारित यू-टर्नचा वापर न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे.
काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी रॉंग साइडने वाहन चालविणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी निर्धारित यू-टर्नचा वापर करावा, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि. शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू आहे. ‘शॉर्टकटच्या नादात रॉंग साइड नको; सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित यू-टर्नच हवा’, असा संदेश या मोहिमेतून देण्यात येत आहे.
