गडचिरोली :अवैद्य जुगार प्रकरणी ३६ जणांवर कारवाई
घटनास्थळावरुन २३ चार चाकी,५ दुचाकी व रोख रक्कम जप्त

लोकशाही न्युज,गडचिरोली/कोरची (दि. १७ ऑगस्ट २०२६)
दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कोटगुल पोलीसांकडून अवैद्य जुगार प्रकरणी ३६ जणांवर कारवाई करण्यात आली तसेच घटनास्थळावरुन २३ चार चाकी,५ दुचाकी व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, आज दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजताचे सुमारास परमेश्वर लोहंबरे रा. नांगपूर, जि. गडचिरोली व मिथुन तांबेकर रा. कोटगुल, ता. कोरची, जि. गडचिरोली हे मौजा नांगपूर, जि. गडचिरोली जंगल परिसरात बेकायदेशिररित्या काही इसमांना गोळा करुन ताश पत्त्यांच्या सहाय्याने अवैद्यपणे पेैसे लाऊन हार जितचा खेळ करीत आहे, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस पथकास मिळाली होती. सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे सपोनि. भगतसिंग दुल्हत व पोलीस पथक असे मौजा नांगपूर येथे पोहचून दोन पंचांसह जंगल परीसरात घटनास्थळी धाड टाकली असता, काही इसम हे बेकायदेशीररित्या ५२ ताश पत्याच्या सहाय्याने पैशाची बाजी लाऊन जुगाराचा खेळ करताना दिसून आले. पोलीसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक व पोलीस स्टेशन कोटगुल येथील पोउपनि. विवेक वायकर व पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणारे १) बिरेंद्र कुमार एवनलाल सिन्हा वय २६ वर्षे, रा. कोटरासरार जि. राजनांदगाव (छ.ग) २) प्रकाश कुमार शामलाल मेश्राम, वय ५० वर्षे,, रा. बजरंग मार्ग जि. राजनांदगाव (छ.ग.) यांच्यासह एकूण ३४ आरोपी तसेच जुगार साहीत्य आणि रोख रक्कम ताब्यात घेतले आहेे.
घटनास्थळावरुन ४, ४१, ५०० रुपये रोख रक्कम तसेच २३ चार चाकी वाहने,५ दुचाकी वाहने, जुगार खेळण्याचे पत्ते, स्टीलची पेटी, लाल रंगाटी बॅटरी, ताडपत्री असा एकूण १,५०,९७,१०० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह एकूण ३४ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
३६ आरोपीविरुध्द पोस्टे कोटगुल येथे अप क्र. ००८/२०२६ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपी १) परमेश्वर लोहंबरे रा. नांगपूर जि. गडचिरोली व २) मिथुन तांबेकर रा. कोटगुल, जि. गडचिरोली यांचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. विवेक वायकर, पोलीस स्टेशन कोटगुल हे करीत आहेत.
