मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी-कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांत खचला
दोषींना तात्काळ निलंबित करा, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा - आजाद समाज पार्टी

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. ५ ऑगस्ट)
एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा कोठी-कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांत खचल्याची घटना ही केवळ बांधकामातील निकृष्ट दर्जाचाच नव्हे, तर सार्वजनिक पैशांच्या उघड लुटीचा पुरावा आहे, असा घणाघाती आरोप आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला आहे.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी सदर पुलियाचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. इतिहासात प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील एवढ्या दुर्गम भागात जाऊन मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनाला तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पूल खचल्याने शासनाच्या बांधकाम गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज बन्सोड म्हणाले, “प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादाने की आणखी कुणाच्या आशीर्वादाने अशा ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे मिळतात? स्थानिक सक्षम ठेकेदार असताना बाहेरील ठेकेदारांना आणून भ्रष्टाचार केला जातो आणि त्यातून अशी निकृष्ट दर्जाची कामे केली जातात. याची जबाबदारी कोण घेणार?”
आजाद समाज पार्टीने स्पष्ट मागणी केली आहे की,
१. संबंधित कामासाठी जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व अभियंत्यांना चौकशीची वाट न पाहता तात्काळ निलंबित करण्यात यावे.
२. संबंधित ठेकेदाराचा परवाना (Licence) तात्काळ रद्द करावा.
३. ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
४. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचार उघड करण्यात यावा.
राज बन्सोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन करत म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उद्घाटनासाठी तुम्ही स्वतः या दुर्गम भागात आला होता. आता या गंभीर प्रकरणातही जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करा. अन्यथा जनतेमध्ये ‘हे सर्व मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे’ असा समज निर्माण होईल, आणि त्याला सरकारच जबाबदार राहील.”
“गडचिरोलीच्या जनतेच्या पैशांवर भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांना आजाद समाज पार्टी कधीही पाठीशी घालणार नाही. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. हा इशारा आझाद समाज पार्टी ने दिला आहे.
