तळागाळात संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरा –जिल्हाप्रमुख पवन गेडाम

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ८ जुलै)
शिवसेना (उबाठा गट) पक्षाची आरमोरी व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक (दि. ७ जुलै) रोजी गडचिरोली येथील सर्किट हाऊसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत नवनियुक्त जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार आणि आगामी राजकीय लढ्याबाबत अत्यंत आक्रमक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनतेच्या न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावात संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. अन्याय, भ्रष्टाचार आणि जनविरोधी कारभाराविरोधात शिवसेना आता अधिक आक्रमकपणे लढेल.
ते पुढे म्हणाले,शिवसेना संपली, शिवसेना शून्य झाली, असे म्हणणाऱ्यांना येत्या निवडणुकांमध्ये जनताच सडेतोड उत्तर देईल. संघटना तळागाळात अधिक सक्षम करून प्रत्येक बूथवर भगवा फडकविण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाने स्वीकारावी.
प्रशासनालाही त्यांनी थेट इशारा देत सांगितले की,जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना जाब विचारेल. चुकीची, भ्रष्ट आणि जनविरोधी कामे करणाऱ्यांना कोणतीही दया दाखविली जाणार नाही. जनतेच्या हक्कांसाठी शिवसेना आगीसारखी पेटेल आणि संघर्ष अधिक तीव्र करेल.
बैठकीत संघटन विस्तार, बूथ समित्यांचे सक्षमीकरण, नव्या कार्यकर्त्यांची नोंदणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आणि जनआंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीला सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड, विधानसभा संघटक नंदू कुमरे, विधानसभा समन्वयक विलास ठोंबरे, दिगंबर मेश्राम, विठ्ठल ढोरे,आशिष काळे, तालुकाप्रमुख पोरटे, संतोष लोनबले, विलास ठाकरे, किशोर चौधरी, घनश्याम कोलते, सदाशिव गहाणे, गोपीचंद पाटे, शहरप्रमुख पप्पू शेख,कल्लू नेताम,सुरेश पुंगाटी,चेतन उरकुडे, वैभव सातपुते,अतुल नैताम, भूषण पोरटे तसेच जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. महिला आघाडीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी मने व माजी पंचायत समिती सदस्या सौ. प्रीती ठाकरे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
बैठकीचा समारोप संघटना मजबूत, शिवसैनिक सज्ज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर संघर्ष या निर्धाराने झाला.
