गडचिरोली : DMF “प्रमा” ४ कोटींच्या कथित घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा
आजाद समाज पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ४ जुलै)
गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या DMF “प्रमा” ४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची संपूर्ण, निष्पक्ष व उच्चस्तरीय विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आज (दि. ४ जुलै) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी व खणीकर्म अधिकारी यांच्या निष्काळजीपणा मुळे व खोट्या सह्यामुळे “प्रमा” प्रकरण घडून आलेले आहे. असे प्रकरण अनेकदा घडले असण्याची शक्यता आहे. व सही जरी खोट्या असल्या तरी यापूर्वी व्यवहार झाल्याशिवाय थेट एकावेळी प्रकरण बाहेर येणे शक्य नाही. यामुळे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होऊन एवढा संवेदनशील विभाग असताना असे घडून येणे ही जिल्हा प्रशासनासाठी शरमेची बाब आहे. त्यासाठी दोन्ही अधिकारी तेवढेच जबाबदार आहेत आणि म्हणून निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आजाद समाज पक्षाची मागणी आहे.
या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीवरून हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, त्यामागे प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि काही प्रशासकीय अधिकारी यांच्या साखळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चौकशी केवळ एका आरोपीपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रशासकीय साखळीचा व नेत्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.
आशिष पिपरे यांचे राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत, तर स्वतः आशिष पिपरे हे काँग्रेस गटातून स्वीकृत नगरसेवक आहेत. भाजपकडून त्यांची तीन महिन्यांपूर्वी हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी त्याबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात एवढ्या गंभीर स्वरूपाचा कथित घोटाळा समोर आल्यानंतरही काँग्रेस पक्षाकडून कोणताही ठोस विरोध किंवा अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. या प्रकरणावर दोन्ही प्रमुख पक्षांच्या मौनामुळे जनतेमध्ये विविध शंका निर्माण होत असून, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची गरज अधिक अधोरेखित होते.
पोलीस विभागाच्या तपासावर प्रश्नचिन्ह
!!
जिल्हा प्रशासनात इतक्या मोठ्या प्रमाणात कथित गैरव्यवहार होत असताना संबंधित प्रशासकीय यंत्रणेला त्याची कोणतीही माहिती नव्हती, हा दावा जनतेला पटणारा नाही. गेल्या ५–७ दिवसांपासून तपास सुरू असूनही या प्रकरणातील इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची नावे समोर न येणेही गंभीर बाब आहे. यामुळे पोलीस विभागावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
आजाद समाज पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की, खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत वेळबद्ध, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जनतेचा पैसा लुटणाऱ्या कोणालाही राजकीय संरक्षण मिळता कामा नये.
जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही किंवा तपास दडपण्याचा प्रयत्न झाला, तर आजाद समाज पार्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला राज बनसोड जिल्हाध्यक्ष, धर्मानंद मेश्राम प्रदेश सचिव विदर्भ, विवेक खोब्रागडे युवा जिल्हाध्यक्ष, नागसेन खोब्रागडे जिल्हा कोषाध्यक्ष, सुरेश वासनिक जिल्हा सचिव, सतीश दुर्गम बार मीडिया प्रभारी, नितेश वेस्कडे युवा तालुकाध्यक्ष, प्रतीक डांगे सदस्य हे उपस्थित होते.
