गडचिरोली : १७ वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २८ मे)
जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या गुरवळा नदी परिसरातील जंगल भागात एका अल्पवयीन मुलाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२८) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पैशांच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बादल नकटुजी कोसनकर (वय १७, रा. डोंगरगाव, ता, जि.गडचिरोली) असे मृत मुलाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी दुपारी १:३० ते २:०० च्या दरम्यान ही घटना घडली. बादल याला आरोपींनी गडचिरोली ते गुरवळा मार्गावरील जंगल परिसरात बोलावले. त्याठिकाणी त्यांच्यात पैशांच्या देणे-घेण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने बादलच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
गुरुवारी सकाळी गुरवळा नदी परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल दाखल केला आहे. या घटनेतील संशयित आरोपींची ओळख पटवण्यासह प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि प्रवीण बुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गुरवळा नदी परिसरात अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे स्थानिक गावकरी हादरून गेले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
