चंद्रपूर : गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू

लोकशाही न्युज, सिंदेवाही (दि.२२ मे )
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजेवाही परिसरातील काही महिला आज पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. महिला जंगलात काम करत असतानाच, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
मृतकांची नावे १.संगीता संतोष चौधरी २.कवळाबाई दादाजी मोहुर्ले ३.अनुबाई दादाजी मोहुर्ले ४.सुनिता कौशिक मोहुर्ले
घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनकर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, वनविभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे.
या भीषण घटनेमुळे गुजेवाही आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून, वनविभागाच्या कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिंस्त्र वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून केली जात आहे. पुढील तपास वनविभाग आणि पोलीस कर्मचारी करत आहेत.
