
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१७ मे)
गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय सर्व सहा सशस्त्र नक्षलवाद्यांसह आठ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. याचबरोबर छत्तीसगडमधील पाच जणांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त झाला आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली नक्षल चळवळीविरोधात ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ राबविण्यात आले. गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक व केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्तपणे सीमाभागात मोहीम उघडली होती. यादरम्यान तेलंगणातून चार, छत्तीसगड सीमाभागातील कुमणार व नैताळा येथून चार, असे एकूण आठ सशस्त्र नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. पोलीस नोंदीनुसार ३१ मार्चनंतर गडचिरोलीत कंपनी क्रमांक १०चे केवळ सहा सदस्य सक्रिय होते. त्यापैकी मोनी मडावी हिने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले, तर उर्वरित पाच जणांना अटक करण्यात आली. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला असून सध्याच्या घडीला एकही सशस्त्र नक्षलवादी सक्रिय नाही.
६५ लाखांची रोकड जप्त व इतर साहित्य जप्त
!!
नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. यात दोन एलएमजी रायफल, चार एके-४७, चार एसएलआर रायफल, तीन इन्सास रायफल यांसह एकूण ५१ बंदुकांचा समावेश आहे.
