धानोरा : ६८ लाखाहून अधिक रुपयांचा गांजा जप्त

लोकशाही न्युज, गडचिरोली/धानोरा (दि. १५ मे)
दि.१४ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनीय माहिती मिळाली असता , मौजा मोहली येथील इसम ईश्वर सखाराम पुंघाटे, वय ५० वर्ष रा. मोहली ता. धानोरा जि. गडचिरोली याने त्याचे शेतशिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व पोस्टे धानोरा येथील पोलीस पथक मौजा मोहली येथे रवाना झाले.
संशयीत इसम ईश्वर सखाराम पुंघाटे, वय ५० वर्ष रा. मोहली ता. धानोरा जि. गडचिरोली यांचे शेतात पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या शेताचे पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या शेतात अमली पदार्थ (गांजा) ची हिरवट रंगाचे असे एकुण ९१ लहान-मोठे फुले असलेले गांजाचे ओलसर झाडे लागवड केलेले मिळून आले.
सदर ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, शेतात लागवड केलेला एकूण १३६.२५ कि.ग्रॅ वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) प्रति किलो ५० हजार रुपये प्रमाणे एकुण ६८,१२,५०० रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतामध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी ईश्वर सखाराम पुंघाटे याचे विरुध्द पोलीस स्टेशन, धानोरा येथे दि. १४ मे रोजी अप. क्र. ६५/२०२६, कलम ८ (क),२० (ब) (त्त्) (क) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस २ दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे धानोरा येथील प्रशांत श्रीकृष्ण जंगले हे करीत आहेत.
