श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूलचा दहावीचा निकाल ९३.१८ टक्के
सुमित बेसेन तोफा विद्यालयात प्रथम

लोकशाही न्युज, गडचिरोली /गोगाव (दि. ९ मे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत प्रगती महिला मंडळ गडचिरोली द्वारा संचालित श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी विविध श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.
यावर्षीच्या निकालात शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी (डिस्ट्रिक्शन) मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सुमित बिसेन तोफा ७९.६०, मिलिंद प्रदीप झंजाळ ७८.६०, श्रीजा दिवाकर चौधरी ७७.६०, दुर्गा कुमोद म्हशाखेत्री ७७.६० आणि सोहम वामन शेंडे ७६.४० या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर अकरा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या विजया मने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठी प्रतिभा असून योग्य मार्गदर्शन यामुळे त्यांनी हे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे गोगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार, संस्थेच्या सचिव कविता पोरेड्डीवार, शाळा समिती अध्यक्षा संध्या पोरेड्डीवार तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळा व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
