गडचिरोली – चंद्रपूर मार्गावर इलेक्ट्रिक बस जळून खाक
२७ प्रवासी सुखरूप, घंटाचौकी जवळील घटना

लोकशाही न्युज, चंद्रपूर (दि. ८ मे)
गडचिरोलीवरून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस टी ) एका इलेक्ट्रिक बसला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील घंटा चौकी जवळ ही घटना घडली. सुदैवाने, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २७ प्रवाशांचे प्राण वाचले असून एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ प्रवाशांना घेऊन ही इलेक्ट्रिक बस गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघाली होती. प्रवास सुरू असताना घंटा चौकी परिसरात अचानक बसच्या खालच्या भागातून धूर निघू लागला. धुराचे लोट पाहून चालकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. चालकाने तातडीने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्याचे आवाहन केले.
सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे लोळ इतके भीषण होते की लांबवरूनही धुराचे लोट दिसत होते. या आगीत इलेक्ट्रिक बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक नियंत्रित केली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले.
या घटनेमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास आता पोलीस आणि महामंडळाच्या तांत्रिक विभागाकडून केला जात आहे. इलेक्ट्रिक बसला लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
