क्रिकेट स्पर्धेत अप्पर-डिप्पर संघाची बाजी
प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १४ फेब्रुवारी)
दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा विशेष आकर्षण ठरली.
आयोजित क्रिकेट स्पर्धेत पालकांच्या अप्पर-डिप्पर क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. शुक्रवारी सायंकाळी अप्पर-डिप्पर संघ व गडचिरोली धुरंधर संघ यांच्यात अंतिम सामना रंगला. या सामन्यात अप्पर-डिप्पर संघाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील सर्व सामने उत्साहात पार पडले. शनिवारी (१४ फेब्रुवारी) शाळा व्यवस्थापनातर्फे विजेत्या अप्पर-डिप्पर संघातील खेळाडूंना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजित नाथानी, मुख्याध्यापक रहिम अमलानी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या स्नेहसंमेलनातील क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
