भाजपा नगरसेवक दांपत्यानी अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाने केली फसवणूक
पीडित महिला बसणार उपोषणावर

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० फेब्रुवारी)
चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रात अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गरीब महिला, शेतकरी व शेतमजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप चामोर्शीचे नगरसेवक आशिष अरुण पिपरे व त्यांची पत्नी नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांच्यावर करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित महिला व पुरुषांनी (.दि ९ फेब्रुवारी) कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन आपली आपबीती सांगितली.
सन २०२० मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत अगरबत्ती प्रकल्प उभारून रोजगार देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४० महिलांना बँक कर्ज मिळवून देण्यात आले. मात्र कर्जमाफी व रोजगाराच्या आश्वासनाआड कर्जाची रक्कम स्वतःच्या नावाने वळती करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर बँकेशी संगनमत करून प्रत्येकी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेण्यात आले. पुढे लाभार्थ्यांच्या खात्यातून जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम विविध मार्गांनी काढून घेतल्याचा आरोप पीडितांनी केला.
प्रकल्पासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील हरीकृष्ण इंजिनिअरिंग कंपनीचे प्रति मशीन एक लाख रुपयांचे कोटेशन दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र सुमारे २५,५०० रुपये किमतीच्या हलक्या प्रतीच्या अगरबत्ती मशीन खरेदी करण्यात आल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. ही मशीन लाभार्थ्यांना न देता आरोपींच्या ताब्यात ठेवून खासगी जागेवर प्रकल्प सुरू करण्यात आला. अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रकल्प बंद पडला.
प्रकल्प बंद झाल्यानंतर महिलांना बँकांकडून कर्जफेडीच्या नोटिसा येऊ लागल्या. रोजगार किंवा मशीनची मागणी केल्यावर, “तुम्ही कंपनीचे सदस्य आहात, कर्ज तुम्हालाच भरावे लागेल,” असे सांगून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्जमाफीचे आश्वासन देत वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर बँकांनी न्यायालयात दावा दाखल केल्याने महिलांना २.५ ते ३ लाख रुपयांच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत.
सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास पीडितांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेला कविता दिलीप किरमे, मीनाक्षी देवराव पिपरे,देवांगना महेश गौतम, निवृत्ता प्रकाश गव्हारे,शीला पुरुषोत्तम धोडरे, कविता रवी कारडे, सुषमा सतीश धोडरे,रेखा सुनील गव्हारे, छाया उमाजी बोदलकर, मेनू विनोद धोडरे,अनिता गुणवंत पिपरे, मनीषा योगेश्वर गव्हारे,सुषमा राजेश बुरांडे,अर्चना किशोर बुरांडे,शारदा बबन पिपरे,साधना बाळा धोडरे,जयश्री रमेश पिपरे, वंदना सविंद्र कोठारे,अर्चना सुनील धोडरे, चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के, ओमदास कवडू झरकर, नितेश दत्तू पिपरे, मिलिंद नामदेव भांडेकर उपस्थित होते.
