गडचिरोली: जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय २१ लक्ष रुपये मिळणार पुरस्कार
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १४ ऑक्टोबर)
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेला २१ लक्ष रुपये पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक सुधीर गोहणे, शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे. जवाहरलाल नेहरू शाळेत सध्या नर्सरी ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे सुमारे १ हजार १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
विजेत्या शाळांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविलेल्या गडचिरोलीच्या शाळेला २१ लक्ष रुपयांचे पारितोषिक जाहिर झाले आहे. राज्यस्तर, विभागस्तर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासकीय व खाजगी गटात एकूण ६६ शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
