जाहिरात
ताज्या घडामोडी

धुळीच्या त्रासाविरोधात महिलांचा पुढाकार

परिसरात तणावाचे वातावरण

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१८ जानेवारी)

गडचिरोली जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव येथे नव्या ले-आऊटमध्ये सुरू असलेल्या उपसा भरण्याच्या कामामुळे संपूर्ण परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन असह्य झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर आज संतप्त महिलांनी पुढाकार घेत थेट रस्त्यावर उतरून अवजड वाहने थांबवली. धुळीच्या त्रासामुळे घराबाहेर पडणेही अशक्य झाल्याने महिलांनी डंपर व ट्रकची ये-जा रोखली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून माती भरण्याचे काम सुरू असून त्यासाठी अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू आहे. कोणतेही गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग अधिक असून वाहन जाताच प्रचंड धूळ उडत आहे. परिणामी हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक व महिलांना बसत असून खोकला, दमा, श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ यांसारख्या आजारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

नवेगाव बसस्टँड ते सेमाना रोड हा महत्त्वाचा रस्ता गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कच्चाच आहे. आजही रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर झालेले नाही. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ, अशी स्थिती कायम आहे.

या प्रश्नासंदर्भात नवेगाव (मूरखळा) येथील सरपंच चांदेकर व उपसरपंच राजू खंगार यांच्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. महिलांनी याआधीही मोर्चे काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना “गाव आबादीत घरं कशाला बांधली?”, “एन.ए. प्लॉट का घेतले नाहीत?” अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवसांपासून कचरा संकलन गाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे.

या सर्व प्रश्नांकडे स्थानिक नागरिकांनी आमदार मिलिंद नरोटे यांचेही लक्ष वेधले आहे. “शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही माणसेच राहतात. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. मुख्य रस्त्यांचे तातडीने सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर करणे, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याचा मारा करणे, अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसवणे तसेच कचरा संकलन तात्काळ सुरू करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नवेगावात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button