शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अझीझ नाथानी यांना गडचिरोली गौरव पुरस्कार जाहीर

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२ डिसेंबर)
देशातील आकांक्षित व मागास गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र उज्ज्वल व मजबूत करताना शिक्षणाला देशभक्ती आणि समाजसेवेची जोड देणारे अझीझ उर्फ (बंटी) हमीद नाथानी यांना गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठेचा गडचिरोली गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार (दि. १) गडचिरोली प्रेस क्लब येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यासह देश व समाजाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पत्रकारीतेच्या क्षेत्रातील आघाडीची संस्था प्रेस क्लबच्या वतीने गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मंगळवार (दि. ६) स्थानिक गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात अझीझ नाथानी यांना मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अझीझ नाथानी हे गेल्या ३० वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गडचिरोलीतील विद्यार्थी गरिबी आणि पैशांच्या कमतरतेमुळे चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी महानगरात जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९७२ मध्ये त्यांचे चुलत भाऊ अलाउद्दीन नाथानी आणि डॉ. लखानी व इतर चार जणांसह प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत प्लॅटिनम ज्युबिली स्कूल सुरू केले. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ही पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. असंख्य आव्हाने आणि संघर्षांना तोंड देत, ही शाळा गेल्या ५० वर्षांपासून या आदिवासीबहुल जिल्ह्यात केवळ सक्रियच नाही, तर शिक्षण क्षेत्र समृद्ध करत आहे.प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव म्हणून अझीझ नाथानी सक्षमतेने नेतृत्व करत आहेत. मुंबई स्थित आगा खान एज्युकेशन सर्व्हिसेस, इंडिया (AKES, I) आणि लंडन स्थित शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम विकसित केला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळांच्या पद्धतींवर आधारित शिक्षण देणारी प्लॅटिनम ज्युबिली ही विदर्भातील पहिली शाळा बनली.गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सोयी ते प्रदान करत आहेत. जिल्ह्यातील या प्रतिष्ठित शाळेतून अनेक अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, सीए, डॉक्टर, अभियंते, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर व्यावसायिक उदयास आले आहे. अझीझ नाथानी सामाजिक योगदानातही अग्रेसर आहेत. ते राष्ट्रीय आपत्ती सहाय्य आणि प्रतिसाद पथकाचे (NDART) सदस् होते. ही FOCUS शी संलग्न युरोपीय-आधारित स्वयंसेवी संस्था आहे. २००५ च्या जम्मू आणि काश्मीर भूकंपादरम्यान, नाथानी यांनी संस्थेने दत्तक घेतलेल्या उरी जिल्ह्यातील चार गावांमध्ये प्रत्यक्ष मुक्काम करत सेवाकार्य केले. देशाच्या नियंत्रण रेषेपासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतान डाकी येथे तंबू, ब्लँकेट आणि अन्न वाटण्यात योगदान दिले. नोटाबंदीच्या काळात लोकांना बँकांमधून पैसे काढण्यास मदत केली. तासनतास रांगेत उभे राहणाऱ्यांना पाणी आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या.
कोविड-१९ साथीच्या काळात असंख्य पीपीई किट उपलब्ध करून दिल्या.त्यांचे देशप्रेमही अभिमानास्पद आहे. अझीझ नाथानी यांनी त्यांच्या शाळेवर २४ तास फडकत रहणारा सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकवला आहे. प्लॅटिनम ज्युबिली स्कूलमध्ये १०० फूट उंच आकाशात फडकणारा ६०० चौरस फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज जिल्ह्यात दाखल झालेल्या प्रत्येकातील देशभक्तीची भावना वृद्धींगत करत आहे. जिल्हा व देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा गडचिरोली गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल प्रेस क्लबतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
