गडचिरोली,(दि.१५) :
खरपुंडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्वे क्रमांक ५० मधील २.१० हेक्टर आर ही जागा वर्ग २ मध्ये असतानाच आधी सपाटीकरण करून, प्लॉट पाडून मग घाईघाईत वर्ग १ करण्यात आली. त्यानंतर येथे प्लॉटची विक्री सुरू केल्यावर जागा अकृषक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे या जमिनीसंदर्भात सारेच नियमबाह्य सुरू असल्याने ही जमिन सरकार जमा करून ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी. येथे विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान तयार करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खरपुंडी ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या २१७४ असून ग्रामपंचायत कार्यालय जुन्या शाळेच्या इमारतीत जागेअभावी कार्यरत आहे. सार्वजनिक प्रयोजनाकरिता कुठलीच जागा शिल्लक नाही. यापूर्वी ५ एप्रिल २०२१ रोजी खरपुंडी येथील सर्वे क्रमांक ४८ हे. आर. २. ३० ही जागा मुलांच्या खेळाचे मैदान व सार्वजनिक प्रयोजनाकरिता मागणी केली होती. त्यावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार, गडचिरोली यांना सव्र्हे क्रमांक ४८ ची चौकशी करून तसा अहवाल ग्रामपंचायत व उपविभागीय कार्यालयास देण्यात यावा, असे कळविले होते. पण, त्यावर पुढे कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मागणी व समस्या तशीच कायम राहिली. मुलांसाठी शैक्षणिक सुविधा म्हणून खेळाच्या मैदानाची आवश्यकता असतानाही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ही जागा ग्रामपंचायतीला मिळू शकली नाही. याशिवाय ग्रामपंचायतीच्या इतर सार्वजनिक प्रयोजनाकरिता हवी असलेली जागा मिळू शकली नाही. त्यामुळे खरपुंडी येथील नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. मागील वर्षभरापासून वारंवार निवेदने पाठवून आणि पाठपुरावा करूनही सव्र्हे क्रमांक ४८ मधील २. ३० हेक्टर आर जागा ग्रामपंचायतीला मिळू शकली नाही. आता गावातीलच सव्र्हे क्रमांक ५० मधील २. १० हेक्टर आर जागा वादग्रस्त ठरली आहे. या जागेला अकृषक करण्यासाठी अर्ज पाठविण्यात आला असला, तरी त्यापूर्वीच अनेक नियमांचा भंग करण्यात आला आहे. शिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांनी आक्षेप पाठविण्याचे आवाहन केल्यावर या जागेच्या व्यवहारासंदर्भात आक्षेपही नोंद करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही जागा सरकार जमा करून घ्यावी व ग्रामपंचायतीला द्यावी. त्यातून ग्रामपंचायतीला गावातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त खेळाचे मैदान तयार करता येईल, आपले कार्यालय बांधता येईल व इतर सार्वजनिक उपक्रमासाठीही या जागेचा उपयोग करता येईल. म्हणून ही जागा ग्रामपंचायतीला देण्यात यावी, अशी मागणी खरपुंडीच्या सरपंच ज्योत्स्ना मशाखेत्री, उपसरपंच ऋषी नैताम व सदस्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
किती दिवस अडचण सहन करायची ?
सध्या ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नसल्याने शाळेच्या इमारतीतच ग्रामपंचायतीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेला व ग्रामपंचायतीला अनेक अडचणी येतात. गावातील मुलांमध्ये अनेक क्रीडागुण आहेत. येथील विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडा सुविधा व मैदान मिळाल्यास ते विविध खेळांत उत्तम प्रदर्शन करून जिल्ह्याचा नावलौकिक करू शकतात. त्यामुळे ग्रामपंचायतीला कार्यालय व विद्यार्थ्यांना क्रीडांगण अत्यावश्यक आहे. आम्ही किती दिवस अडचण सहन करायची, असा संतप्त प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व पालकांनी विचारला आहे.
जाहिरात
