
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १८ एप्रिल)
गडचिरोली शिक्षणाचा हवक कायदा (आरटीई) अंतर्गत विद्याथ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक युवा कार्यकर्ता रुपेश वलके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद गडचिरोली येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
दरवर्षी आरटीई अंतर्गत अनेक विद्याथ्यांची निवड केली जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये अर्ज करताना दिलेल्या माहितीबाबत शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या रहिवासी पत्ता आणि शाळेपासूनचे अंतर याबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अर्जामध्ये केलेला पत्ता नमूद प्रत्यक्ष अस्तित्वात आहे का,शाळेपासूनचे १ किलोमीटर अंतर अचूक आहे का याची प्रत्यक्ष पंचनामा करून खात्री करावी, तसेच संबंधित कुटुंब त्या परिसरात वास्तव्यास आहे का याची तपासणी करावी, असे निवेदनात नमूद आहे.
तसेच विद्याध्यर्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या आधारकार्डवरील पत्ता पडताळून पाहणे, पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला अनिवार्य करणे, तसेच पालकांचे वेतन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व बाबींची खात्री करूनच आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने पात्र, गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असे रुपेश वलके यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील १५ दिवसांत योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
