गडचिरोली : आज ५ परीक्षा केंद्रावर नीट (युजी)-२०२५ परीक्षा
परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लोकशाही न्युज गडचिरोली ( दि.४ मे )
आज ४ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एन टी ए), नवी दिल्ली यांच्यामार्फत नीट (युजी)-२०२५ ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा गडचिरोली मुख्यालयातील ५ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. जवळपास २ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा शांततेत पार पडावी व परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या साहित्याना आहे मनाई
!!
परीक्षेच्या कालावधीत झेरॉक्स मशिन, फॅक्स, एसटीडी बूथ सुरू ठेवता येणार नाहीत. मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा आदी उपकरणांचा वापर तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश वर्ज्य आहे. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी, गाणी म्हणणे, भाषण करणे, घोषणाबाजी, वाद्य वाजविणे तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी करण्यास मनाई आहे.
शस्त्र, धारदार हत्यारे, स्फोटके, दाहक द्रव्ये, किंवा इजा करण्यास सक्षम वस्तू घेऊन परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात येण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेच्या दिवशी या परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश निषिद्ध राहील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, हा आदेश फक्त परीक्षा कालावधी साठी अमलात राहणार आहे.
या ५ परीक्षा केंद्रावर होणार परीक्षा
!!
१) स्कूल ऑफ स्कॉलर २)शिवाजी हायस्कूल गोकुलनगर ३) कार्मेल हायस्कूल ४) शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड ५) शासकीय विज्ञान महाविद्यालय या पाच ठिकाणी परीक्षा केंद्र राहणार आहेत.
