१० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम, आमदार डॉ. होळी
पत्रकार परिषदेतुन केला "जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक"माहिती पत्रकाचे विमोचन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ सप्टेंबर)
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझ्या जनतेने मला निवडून देऊन १० वर्ष काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न केला, केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम केले. या १० वर्षाच्या कालावधीमध्ये आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील ५० वर्षात कधीच न झालेली कामे पूर्ण करण्याचा यथोचित प्रयत्न केला त्या कामांचा लेखाजोका मांडण्याचा प्रयत्न मी या “जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक” या माहिती पत्रकातून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हा भाजपा महामंत्री सौ योगिता पिपरे,तालुका अध्यक्ष लतात पुंघाटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा युवा मोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, शहराच्या अध्यक्ष कवीता उरकुडे, तालुक्याचे महामंत्री बंडू झाडे,अनुसूचित जातीचे जनार्दन साखरे,शहराचे महामंत्री विवेक बैस, तालुका महामंत्री देवानंद चलाख, भाजप नेते यशवंत झरकर यांचे सह मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार डॉ देवराव होळी म्हणाले की, कोटगल बॅरेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी सुरजागड पोलाद कारखाना, नगरपंचायतीची निर्मिती, जिल्हा स्टेडियम, महिला व बाल वाढीव रुग्णालय, हजारो कोटींच्या रस्त्यांची, पुलांची कामे, तालुका क्रीडांगणे, बस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, प्रशासकीय भवनांची निर्मितीसह अनेक मोठी कामे आपण केलेली आहे. जिल्हा निर्मितीच्या इतिहासात कधी नवे एवढी कामे या १० वर्षाच्या कालावधीत झाली असल्याचा पुनरुचार त्यांनी या पत्रकार परिषदेतून केला.
