रस्ते बांधकामात भ्रष्टाचार प्रकरणी बेमुदत आंदोलन

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२७ सप्टेंबर)
गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे.या गैरव्यवहारप्रकरणी संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याच्या मागणीला घेऊन गुरुवार पासून आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात गडचिरोली बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली तालुक्यांमध्ये सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, सदर कामात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांनी संगनमत करीत निकृष्ट दर्जाचे काम करून पैशाचा अपहार केल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची वाट लागली आहे. बांधकामादरम्यान एकाही अभियंत्याने बांधकामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही. त्यामुळेच निकृष्ट बांधकाम होऊन अवघ्या काही महिन्यातच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होत असून, याप्रकरणी दोषी बांधकाम विभागाच्या अभियंत्याला निलंबित करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनात आज पहिल्या दिवशी योगाजी कुडवे यांचेसह नीलकंठ संदोकर,चंद्रशेखर सिडाम,रघुनाथ सिडाम,राजू गडपायले, अरविंद देशमुख,आशिष नक्षीने,ईश्वर तिवाडे आंदोलनात सहभागी होते.
₹
