आत्मसमर्पित महिला नक्षलीशी गडचिरोली च्या तरुणाने केला विवाह
लग्न सोहळ्याला एसपी ची हजेरी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ ऑगष्ट)
गडचिरोली शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला. मागील वर्षी ७/१०/२०२३ रोजी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला नक्षली रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी वय २८ वर्ष हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी वय २६ वर्ष याचेसोबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने आज दि. १६ ऑगष्ट ला विवाह संपन्न झाला.
(लग्न सोहळ्याला हजर राहून शुभ आशीर्वाद देताना पोलीस अधीक्षक निलोत्पल )
गडचिरोली जिल्ह्यात शेती ची कामे करून सर्वसामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी, वय २६ वर्षे, रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा) ता.अहेरी जि. गडचिरोली व रजनी वेलादी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता आज त्यांचा विवाह लावून दिला.
पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार हे लग्न सोहळ्याला हजर होते.
