लाडकी बहिण तुपाशी आणि भाचे मात्र उपाशी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ ऑगस्ट)
महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आखली आणि ती अमलात ही आली. दि. १४ ऑगष्ट रोजी पात्र बहिणीच्या खात्यात महाराष्ट्र सरकारने पहिला हप्ता जुलै, ऑगष्ट चा असा मिळून ३ हजार रुपये जमा सुद्धा केले. परंतु हे सर्व करीत असतांना सरकारला लाडक्या मामाचा आणि भाचा आणि भाटव्यांचा विसर पडलेला दिसत आहे.
शासनाने पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले आहे. दरवर्षी १५ ऑगष्ट पूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तके मिळायची पण यावर्षी मात्र लाडक्या मामाचे भाचे जुन्याच फाटक्या व जुन्याच गणवेशात स्वतंत्रदिन साजरा करतांना दिसले. त्यामुळे भाच्यांकडे दुर्लक्ष झाले की काय असेच म्हणावे लागेल.
शासनाने विविध योजनामार्फत भाटव्याना घरकुल, सिंचन विहिरी यासारख्या योजनांचा लाभ दिला. घरकुलाचा पहिला हप्ता जमा केल्यामुळे भाटव्याने राहते कच्चे घर पाडून पक्का घर बांधण्यास सुरवात केली परंतु शासनाने निधीअभावी पुढचे हप्ते घरकुल लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा न केल्यामुळे सदर भाटव्याने दुसऱ्याकडून कर्ज काढले व राहण्याची अडचण असल्यामुळे आपले घराचे बांधकाम पूर्ण केले व ते चातकाप्रमाणे घरकुलाच्या निधीची वाट पाहत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले त्याचे शासनस्तरावरून पंचनामेही झाले मग हि नुकसानभरपाई २०२१/२०२२ प्रमाणे २ वर्षाने मिळणार का? मग अन्न, वस्त्र, निवारा त्यासोबत शिक्षण या मुलभूत गरजा असताना सुद्धा सरकारची शिक्षण आणि घरासंबंधी उदासीन भूमिका का? भाचा आणि भाटवा या दोघानांही वाऱ्यावर सोडून मात्र मामाला फक्त आपल्या बहिणींची चिंता आहे पण कोणतीच बहीण आपल्या मुलांना व पतीला वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळे मामाने हि गोष्ट लक्षात घ्यावी की, आपण दिलेल्या लाडक्या बहिणीला ही रक्षाबंधन ची ओवाळणी बहिणीला किती सुखदायक आहे हा विचार करून लाडक्या बहिणींचा संसार कसा सुखी करता येईल याकडे लक्ष द्यावे.
