गडचिरोली : शहरात पाणी साचलेल्या भागांची लोकप्रतिनिधींकडून पाहणी, तातडीने उपाययोजनांचे निर्देश

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१ ऑगस्ट २०२६)
गडचिरोली शहरात गेल्या काही दिवसा पासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्ते, वसाहती आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे, नगरसेवक सागर निंबोरकर, नगर परिषद पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर, नगरसेवक शेखर आखाडे आणि नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांच्यासह यांनी शहरातील विविध पाणी साचलेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी जलनिकासीच्या नाल्यांची पाहणी करून अडथळे दूर करण्यावर भर दिला. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते, त्या ठिकाणी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या ग्वाही दिली
मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून काळजीपूर्वक प्रवास करावा तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ नगर परिषद किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगर परिषद प्रशासन कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
