जाहिरात
आरोग्य

अतिदुर्गम कोहका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एकलव्य ट्रायबल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा उपक्रम

Spread the love

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि,२४ एप्रिल)

एकलव्य ट्रायबल ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन ही गडचिरोली येथील एक अशासकीय सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील दुर्गम आदिवासी खेड्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य केले जात आहे.

सदर संस्थेच्या वतीने दर रविवारी गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून सर्वसाधारणपणे १०० की. मी. अंतरावर असलेल्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम आदिवासी खेड्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. त्यासाठी दर रविवारी गडचिरोली येथून डाॅक्टर, फार्मासिस्ट, नर्स आणि काही स्वयंसेवी कार्यकर्ते घेऊन फाऊंडेशनची टीम एटापल्ली तालुक्यातील कसनसूर व जारावंडी परीसरातील आदिवासी खेड्यात जात असतात. अशा गावात दिवसभराचे आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते.

अशा शिबिरात गावातील रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते आणि रुग्णांना पुर्णतः मोफत औषधोपचार केला जातो. एनिमीयाचे रुग्ण, चर्मरोग, डोळ्यांचे विकार, बालकांमधील कुपोषण, महिलांचे विकार, इत्यादी आजारांवर मोफत औषधोपचार केला जातो. या उपक्रमांतर्गत रविवार दिनांक २१ एप्रिल, २०२४ रोजी फाऊंडेशनच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील कोहका या दुर्गम आदिवासी खेड्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोहका हे घनदाट जंगलात वसलेले एक छोटेसे आदिवासी खेडे आहे. शिबिरात २६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला. डाॅ सचिन कामडी, लाईफ लाईन हास्पीटल गडचिरोली यांनी रुग्णांची तपासणी केली. फार्मासिस्ट पुरुषोत्तम आयतूलवार, नर्स पल्लवी उंदिरवाडे, फाऊंडेशनचे सदस्य राकेश चौधरी व शितल गेडाम यांनी शिबिरात सहाय्य केले.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सेवेची परिस्थिती अत्यंत विदारक आहे हे सर्वश्रृत आहे. अजूनही दुर्गम आदिवासी भागात पुरेशी आरोग्य सेवा पोहचलेली नाही. अनेकदा उपचारा अभावी रुग्णांना प्राणही गमवावा लागतो. जिल्ह्यातील आदिवासींची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताचीच आहे. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा गडचिरोलीला उपचारासाठी जाणे अशक्यप्राय असते. तेव्हा ‘आरोग्य सेवा दुर्गम आदिवासी भागातील लोकांच्या दारी’ हा संकल्प घेऊन श्री गणेश कोवे आणि त्यांच्या अर्धांगीणी सौ. रितू कोवे यांनी ‘एकलव्य ट्रायबल ॲन्ड रुरल डेव्हलपमेंट फाऊन्डेशन’ या एनजीओ ची स्थापना केली.

कोवे दाम्पत्य हे या एनजीओ चे संस्थापक आहेत. विशेष म्हणजे ते स्वतः आदिवासी समाजाचे असून मुळचे एटापल्ली येथील आहेत. त्यामुळे आपल्या एटापल्ली या गृह तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांची आरोग्य सेवेच्या बाबतीत होत असलेली हेळसांड व ससेहोलपट बघून कोवे दाम्पत्यांनी या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. विशेष म्हणजे गणेश कोवे हे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वर्ग १ अधिकारी होते. पण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात आपल्या बांधवांच्या सेवेसाठी त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि या एनजीओ ची स्थापना केली. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गम आदिवासी भागातील रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवाकार्यात त्यांच्या सौभाग्यवती रितू कोवे या त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाज सेवेचे कार्य करीत आहेत. प्रसिद्धी पासून दूर राहून कोवे दाम्पत्य एटापल्ली तालुक्यातील आदिवासींच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाकार्यात गडचिरोली शहरातील डाॅ. सचिन कामडी, लाईफ लाईन हास्पीटल, डाॅ. सोनम गोहणे, डाॅ. वैभव तातावार, डाॅ सायरा महाजन, डाॅ. चंद्रकांत लेनगुरे, डाॅ. सुप्रिया सातपुते इत्यादी डाॅक्टर मंडळी तथा पुरुषोत्तम आयतूलवार, पल्लवी उंदिरवाडे, पुजा आत्राम, तारा वड्डे, निशीगंधा लडके, प्रफुल्ल उराडे इ. आरोग्य कर्मचारी तथा फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी व स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी आहेत. कोणतेही शासकीय अनुदान न घेता केवळ लोकवर्गणीतून त्यांचे हे रुग्णसेवेचे कार्य अविरतपणे चालू आहे. अशा या समाज सेवेच्या कार्याची शासनदरबारी दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button